लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनाही घडतात. यावर्षी वीज पडून आतापर्यंत तिघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जनावरेही वीज पडून ठार झाली आहेत. त्यामुळे वीज कडाडताच मोबाईल बंद करणे, झाडांपासून सतत दूर राहणे व इतर सतर्कताही महत्त्वाची ठरते.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून वळीवाचा पाऊस सुरु होतो. त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस येतो. या काळात जोरदार वारे वाहतात तसेच वीज पडण्याच्या घटनाही घडतात. वीज पडण्याने दरवर्षी अनेक शेतकरी, नागरिक तसेच मजुरांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर जनावरेही ठार होतात. शासन नियमानुसार वीज पडून ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येते.
यावर्षी उन्हाळ्याच्या काळात सातारा जिल्ह्यात तिघा शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर जनावरे चारण्यास गेलेली एक महिलाही ठार झाली होती. वीज पडल्याने शेळ्यांचाही मृत्यू झाला होता.
......................................
यावर्षीचे वीज पडून मृत्यू...
२९ एप्रिल रोजी कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजजवळ शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात खंडाळा तालुक्यात जेवणाला बसलेल्या दोघा शेतकऱ्यांवर वीज पडली होती. यामध्ये दोघेही ठार झाले होते. तर माण तालुक्यात जनावरे चारण्यास गेलेली महिला ठार झाली होती. माणमधील दुसऱ्या एका घटनेत १० शेळ्या व एक बोकड ठार झाला होता.
...........................................................
अशी मिळेल नुकसानभरपाई
- वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार रुपये.
- ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत.
- वीज पडून जखमी झालेली व्यक्ती एका आठवड्यापेक्षा अधिककाळ रुग्णालयात दाखल असल्यास १२,७०० रुपये मिळतात.
- एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४,३०० रुपये मदत मिळते.
..........................................................
वीज पडत असताना ही घ्या काळजी...
- शेतात विजा चमकत असताना जवळील घरात त्वरित आसरा घ्यावा.
- शेतातील सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यावर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा.
- दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे.
- पायाव्यतिरिक्त शरिराच्या कोणत्याही भागाचा जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- ओल्या शेतात तसेच तलावात काम करणाऱ्यांनी त्वरित कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.
- पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण. शक्य असल्यास घरावर वीजवाहक यंत्रणा बसवावी.
- आपले घर, शेताच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
- वीज, टेलिफोनचा खांब, टॉवरजवळ उभे राहू नये.
- विजेचा प्रकाश आणि आवाज यामध्ये ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. अशावेळी सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा.
- शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.
...........................................................