पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. याबाबतच्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गावरील चोराडे-पुसेसावळी या नऊ किलोमीटरच्या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विस्तारल्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अचानक येणाऱ्या वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील काही वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. रुंदीकरणानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामध्ये नांदणी पुलानजीकच असलेल्या वळणाचा प्रामुख्याने समावेश आहे. रस्त्याच्या रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या वळणाच्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. वेग नियंत्रणासाठी वाहनचालकांतून या वळणाच्या दोन्ही बाजूला काळे-पांढरे पट्टे ओढणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत वाहनचालक प्रवासी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
चौकट:
सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करावा
प्रामुख्याने नांदणी पुलाजवळचे धोकादायक वळण केवळ अपघातच घडल्यानंतर चर्चेत येते. संबंधित विभाग ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलत नसल्याने अपघात होत आहेत. या मार्गावरील सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.
फोटो २९पुसेसावळी रोड
विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील या धोकादायक वळणावर सातत्याने अपघात घडत असतात. त्यामुळे उपाययोजना करण्याची गरज आहे. (छाया : राजीव पिसाळ)