आॅनलाईन लोकमतम्हसवड , दि. २0 : मोठा पाऊस होण्यापूर्वीच पळशी, ता. माण गावाला पाणीपुरवठा करणारे टँकर प्रशासनाने बंद केले आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी घटलेलीच असून अद्यापही तळ गाठलेलाच आहे. त्यातच प्रशासनाने टँकर बंदचा आदेश काढल्याने पळशीकरांना पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. टँकर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पळशी गावाला पाणीटंचाईतून दिलासा देण्यासाठी सुरू केलेला टँकर पाऊस झाला हे कारण पुढे करून बंद केला आहे. त्यामुळे गंभीर पाणीटंचाईला पळशीकरांना सामोरे जावे लागणार आहे. पळशी गाव हे माण तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेले खेडेगाव आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर माणगंगा नदी पात्रात आहे. या विहिरीने तळ गाठला असून आदीच पळशीकरांना दहा दिवसांतून पाणी पुरवठा होत होता. सध्या पळशी परिसरात किरकोळ प्रमाणात पाऊस झाला असून अद्याप मोठा पाऊस झाला नाही. विहिरींना पाणी उपलब्ध नाही. ग्रामस्थांबरोबर ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने काही भागात चांगली हजेरी लावली असली तरी काही भागात हजेरीही लावली नाही. त्याभागातील जनता अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तरी प्रशासनाने ज्या गावातील पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर बंद केले आहेत. त्या गावांची फेर पाहणी करुन निर्णय घ्यावा. ज्या गावांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे. तेथे टँकर सुरु करावेत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. पळशी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अद्याप पाणी नाही. प्रशासनाने बंद केलेले पाण्याचे टँकर पुन्हा सुरू करावेत. अन्यथा गावाला पाणीपुरवठा करणे अवघड होईल.- वैशाली करे,
सरपंच पळशीसध्या पाणीपुरवठा हा टँकरच्या पाण्यावरच अवलंबून होता. सध्या प्रशासनाने टँकर बंद केल्याने व पाऊस न झाल्याने पाणी मिळणार नाही. - विशाल नाकाडे, ग्रामस्थ