सिद्धार्थ सरतापे
वरकुटे-मलवडी
कांदा हे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापीत माण तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या कुरणेवाडीतील कांतिलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे..
कुरणेवाडी येथील कांतिलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांची अडीच एकर जमीन आहे. याअगोदर त्या जमिनीत ज्वारी, बाजरी यांसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यावरही कधी अस्मानी, तर कधी सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतीतून जेमतेम प्रपंच चालवण्याइतपतच उत्पन्न निघत असे. अनेकदा प्रचंड तोटाही सहन करावा लागत असे. यामुळे शेती करत असताना उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण शेतात कांदा लागवड करायचे ठरवले.
गेल्या वर्षी दमदार पडलेल्या पावसाने पाणी साठा टिकून आहे. मशागतीसाठी एकूण दीड लाख रुपये खर्च आला. साधारण ८० दिवसातच अडीच महिन्यांचा कांदा ६ टन विकला. त्यास साधारणपणे ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानुसार २ लाख ४० हजार रुपये झाले आहेत आणि पाच महिन्यांच्या दीड एकर कांद्याची काढणी सुरू आहे. तोही चांगला पोसला असून, जवळपास १९ ते २० टन भरणार असल्याची खात्री आहे. चालू कांद्याच्या वाढत्या दरानुसार सरासरी ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता असून, ९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
ऑक्टोबरपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाच महिन्यात बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना वरकुटे - मलवडी परिसरातील कृषी मार्गदर्शक अनिरुद्ध (छोट्या) आटपाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगलीच्या बाजारपेठेत बोली लावून व्यापाऱ्यांना कांद्याची विक्री केली. कांद्याचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने सर्व खर्च वजा जाता १० लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
कोट :
आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याने तोट्यात जात होतो. परंतु कांद्याची आधुनिक पद्धतीने लागवड करून कमी खर्चात आणि जेमतेम पाण्यात चांगले उत्पन्न मिळवले. शिवाय कोणत्या वेळेला कोणती खते द्यायची, याबाबत माहिती करून घेतल्यास, कमी पाण्यातसुद्धा दर्जेदार उत्पन्न मिळवता येते. याबद्दल खात्री झाली आहे.
कांतिलाल खांडेकर.
(सामान्य शेतकरी, कुरणेवाडी)