सातारा : साताऱ्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात थाटण्यात आलेल्या टपऱ्यांवर सोमवारी सातारा पालिकेकडून कारवाई करण्यात आली. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने विक्रेते व टपरीधारकांचा विरोध झुगारून येथील बारा टपऱ्या जप्त केल्या.
शहरातील अतिक्रमणाचा विषय हा नेहमीच चर्चेचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील टपऱ्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती. व्यावसायिक स्पर्धेतून हे कृत्य घडले असून, या परिसरात टपरी लावण्यासाठी नेहमीच चढाओढ होत असल्याचे दिसून येते. पालिकेने गतवर्षी आरटीओ परिसर अतिक्रमणमुक्त केला होता; मात्र काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेतली.
सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अतिक्रमण विभागाचे प्रमुुख प्रशांत निकम यांच्यासह आठ कर्मचारी जेसीबी, टीपर अशा लवाजम्यासह आरटीओ कार्यालयाजवळ आले. यानंतर तातडीने रस्त्याकडेला थाटण्यात आलेल्या चहा व खाद्यपदार्थ्यांचे गाडे तसेच इतर टपऱ्या जप्त हटविण्यात आल्या. पथकाकडून एकूण बारा टपऱ्या जप्त करण्यात आल्या. अनेक महिन्यांनंतर आरटीओ परिसराने मोकळा श्वास घेतला.
(चौकट)
दोन लोखंडी गेट जप्त
मिल्ट्री कॅन्टिजवळ असलेल्या जेसीओ सोसायटीतील नागरिकांनी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतरीत्या दोन लोखंडी गेट उभे केले होते. हे गेट हटविण्यात यावेत, अशी तक्रार काही नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिक्रमण पथकाने मिल्ट्री कॅन्टिनजवळील दोन गेट जप्त केले.
फोटो : १५ जावेद ०१/०२
सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या जप्त केल्या. (छाया : जावेद खान)