कोल्हापूर : करिअर निश्चितीतील महत्त्वाचा टप्पा असलेला बारावीचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९२.१३ टक्के लागला. विभागाच्या निकालात ०.५९ टक्के वाढ झाली आहे. टक्का वाढूनही विभाग राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. कोल्हापूर विभागात ९२.६४ टक्क्यांसह सातारा जिल्हा अव्वल ठरला. सांगलीने ९२.२८ टक्क्यांसह द्वितीय आणि गेल्यावर्षी विभागात प्रथम असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची घसरण होऊन ९१.६४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी बुधवारी दुपारी एक वाजता येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी शिक्षणाधिकारी डी. बी. कुलाल, सहसचिव पी. डी. भंडारे, सहाय्यक सचिव बी. एस. रोटे, आदी उपस्थित होते.कोल्हापूर विभागातून ७०२ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ६ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६४ हजार ५३० मुले, तर ५१ हजार २०७ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७ हजार ३३४ असून, त्यांचे प्रमाण ८८.८५ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९ हजार २९७ असून, त्यांचे प्रमाण ९६.२७ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ७.४२ टक्के इतके अधिक आहे. सलग चौथ्यावर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. सातारा जिल्ह्यातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५ हजार ९९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.६४ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील २२८ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३२ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.२८ टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २५७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ६४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५७ हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८५ टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात गुरुवारी (दि. ४ जून) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. (प्रतिनिधी)
बारावीत साताराच अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2015 12:14 AM