कऱ्हाड : ‘सभासद कारखान्याचा मालक आहे आणि त्याला प्रत्यक्षात गुलामापेक्षा वाईट वागणूक द्यायची, ही सह्याद्रीच्या साखरसम्राटाची खासियत आहे. जर सभासद खरंच मालक असेल, तर कारखान्याचा अध्यक्ष गुऱ्हाळाच्या गुळव्याप्रमाणे कारखान्याचा गुळव्या असायला पाहिजे; पण आज गुळव्याच पंचवीस लाखांच्या गाडीतून फिरतोय. त्याच्या दिमतीला साखर कारखान्याची यंत्रणा वापरली जाते; पण खऱ्या मालकाची काय अवस्था आहे, हे न सांगितलेलंच बरं ! हे सारं बदलण्याची संधी आली आहे. त्या संधीचा लाभ उठवा,’ असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी लगावला.तांबवे, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. पॅनेलप्रमुख लालासाहेब यादव, काँग्रेसचे धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, भीमराव पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, जयदीप यादव, उत्तम दसवंत, बाबूराव पवार, सह्याद्रीचे माजी संचालक निवासराव पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, कोयना बँकेचे संचालक अविनाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.खोत म्हणाले, ‘कारखान्याचा फक्त एक टक्का साखर उतारा चोरला तर सह्याद्रीचे गळीत लक्षात घेता प्रतिटन दहा किलो साखरेचे तेरा लाख मेट्रिक टन वजनाचे वर्षाला ३२ कोटी मिळतात. मोकळी पोती, काटामारीसह इतर कमिशन वेगळेच. अशा साखरसम्राटाला धडा शिकविण्यासाठी हक्काच्या लढाईत एकत्र या.’ ‘यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखान्याचा शेतकरी मालक बनविण्याची किमया केली; पण ज्यांच्या हातात सत्ता राहिली हीच मंडळी आज मालक बनली आहेत. खरंतर सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणुकीत पॅनेल टाकणेच अवघड. अशा परिस्थितीत एकास एक उमेदवार दिला हाच आपला पहिला विजय आहे.’लालासाहेब यादव म्हणाले, ‘सह्याद्रीत यशवंतरावांच्या विचारांचीच प्रतारणा सुरू आहे. कारखाना खासगी करण्याचा कुटील डाव असून, त्यासाठीच कोट्यवधींच्या आर्थिक अडचणीत आणला आहे. आज कारखाना ८० कोटी शॉर्टमार्जिन मध्ये आहे. गतवर्षीची १३ लाख पोती शिल्लक आहेत. आणि कोट्यवधींचा भुर्दंड संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे सभासदांच्या माथ्यावर मारला जात आहे. संचालक मंडळ म्हणजे ‘तोंड असून बोलायचे नाही आणि डोळे असून बघायचे नाही,’ अशी अवस्था आहे.’ निवासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठलराव जाधव यांनी आभार मानले. यावेळी महेंद्र पाटील, रघुनाथ नलवडे, शिवाजीराव गायकवाड, उत्तम पाटील, तानाजी पवार, श्रीमंत काटकर, तुकाराम डुबल, एच. एन. सुर्वे, प्रभाकर शिंदे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शेकडो सभासद उपस्थित होते. यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. (प्रतिनिधी)तर त्यांनाही मानधन देईन..‘मी २७ वर्षे चळवळीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आणि येरवडा जेलची हवाही खाल्ली आहे. पण, मी इथे प्रचाराला आलो तर मानधनावरचा प्रचारक असा आरोप सुरू झालाय. आमदार बाळासाहेबांनीही शेतकऱ्यांसाठी चळवळ करून दाखवावी. एकदा तरी कळंबा जेलमध्ये जावं. मग मीही त्यांना मानधन देईन,’ अशी खिल्ली सदाभाऊ खोत यांनी उडविली.सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा चेहरा नेहमीच दारिद्र्यरेषेखाली असल्याप्रमाणे दिसतो; पण त्यांच्या वरकरणी रूपाला भुलू नका. त्यांनी सह्याद्रीतून भरपूर हाणलंय, अशी खरपूस टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली.
गुळव्या पंचवीस लाखांच्या गाडीतून!
By admin | Published: March 13, 2015 11:04 PM