कराड- येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या वस्तीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र भयावह आगीत 24 घरे जळून खाक झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे न्यायालयाच्या समोरील बाजूस बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आहे. या परिसराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली. एका घराला लागलेली ही आग वेगाने वाढत गेली. आग लागल्याने महिलांसह नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील इतर घरांत झोपलेल्या कुटूंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत गेली. आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला.