कऱ्हाड : साळशिरंबे (ता़ कऱ्हाड) व लगतच्या गावात गॅस्ट्रोसदृश साथीची वीस जणांना लागण झाली आहे़ त्या रुग्णांना उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत़ दूषित पाणी प्यायल्याने संबंधितांना साथीची लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे़ साथीची लागण झालेल्यांमध्ये साळशिरंबे येथील वनिता कुंभार, प्रशांत लोखंडे, संगीता कुंभार, महादेव पाटील, सवंत कुंभार, साक्षी साठे, सचिन साठे, जिंती येथील उत्तम पाटील, म्हासोली येथील वनिता पाटील, भुरभुशी येथील दिनेश पाटील अशी रुग्णांची नावे आहेत़ यामधील काही जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत़, तर काही रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. साळशिरंबे येथे पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे़ त्यातच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ दूषित पाण्याचे मोठे डबके भरले आहे़ गावातील जनावरे तेथे धुण्यासाठी आणली जातात़ तेथेच महिला कपडे धुतात़ त्यामुळे गळती लागलेल्या वाहिनीत काही वेळा दूषित पाणी जाते़ साथ आटोक्यात आणण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून पथक तयार करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, डॉ़ सुनील कोरबू, डॉ़ शेडगे यांनी गावाला भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या़ दरम्यान, येवती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने संबंधित गावामधील पाण्याचे नमुने तपासण्यात आल्याचे डॉ़ शेडगे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)