सातारा : वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही जिल्ह्यातील वीस वीजग्राहक विनापरवाना विजेचा वापर करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ तसेच कलम १२६ नुसार कारवाई सुरूआहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजपुरवठा खंडित केलेल्या १२९६ थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.बारामती परिमंडल अंतर्गत सातारा व सोलापूर जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ३७१९ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १९८ ठिकाणी थेट वीजचोरीद्वारे तसेच शेजाऱ्यांकडून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्याची महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद झाल्यानंतर अशा ग्राहकांच्या वीजजोडण्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पुणे प्रादेशिक विभागासोबतच परिमंडल, मंडल व विभागस्तरावरील वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत व गेल्या तीन दिवसांपासून ही पथके सातारा जिल्ह्यात तपासणी करीत आहेत. रात्रीच्या कालावधीतसुद्धा ही तपासणी सुरू आहे.जिल्ह्यातील वाई, सातारा, वडूज, कऱ्हाड , फलटण या पाच विभागांमध्ये १२९६ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आठ ठिकाणी थेट वीजचोरीद्वारे तर बारा ठिकाणी शेजाऱ्यांकडून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.बिल भरणासाठी आधुनिक प्रणालीचालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.