लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींची सुमारे २७ वर्षांनंतर भेट झाली. या भेटीतून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी निमित्त होते पाटण येथील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमधील १९९३-९४ बॅचमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.
पाटण येथील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमधील १९९३-९४ बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा झाला. या वर्गातील सुमारे ३० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. अनेक मित्र-मैत्रिणींची सुमारे २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भेट होत असल्याने त्याच्यात मोठी उत्सुकता होती. शालेय मित्र-मैत्रिणींना पाहताच एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी भेटल्यानंतर एकमेकांची विचारपूस करत शालेय मित्र-मैत्रिणी गप्पांमध्ये दंग झाले होते. यावेळी शाळेतील अभ्यास, त्यावेळी परीक्षेत मिळालेले गुण, केलेल्या खोड्या, शिक्षकांचा खाल्लेला मार, स्नेहसंमेलनातील सहभाग आदीसह अनेक विषयांवरील गप्पांची मैफल रंगली होती.
सुरुवातीच्या सत्रात प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. त्यामध्ये कोणी पोलीस अधिकारी, सीए, पत्रकार, वकील, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक आदींसह विविध क्षेत्रात काम करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुलींमध्येही कोणी नोकरदार तर कोणी गृहिणी असल्याचे सांगितले. त्यानंतर गंमतीदार खेळ खेळण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा निर्धारही केला. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्नेहमेळाव्याला उपस्थित असणाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. अमिता चव्हाण, रंजना सुर्वे, इंद्रायणी शिंदे, किशोर गुरसाळे, अमरसिंह पाटील, सचिन देशमुख यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
या स्नेहमेळाव्याला संतोष जाधव, रियाज मुजावर, उदय रणदिवे, अकबर मुकादम, तुकाराम पवार, सूर्यकांत सुतार, संभाजी कदम, इक्बाल शेख, रावसाहेब झगडे, अजय तांदळे, गणेश पाटील, रंजना मोरे, स्मिता निकम, नीता पोतदार, स्मिता जाधव, राखी लांबोर, संजीवनी धांडे, ज्योती मुळे, ज्योती चव्हाण, वनश्री गायकवाड, आशा गुरव, वैशाली बागडे आदीं उपस्थित होत्या.
फोटो
पाटण येथील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमधील १९९३-९४ बॅचच्या स्नेहमेळाव्यात दहावीतील माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
5pramod 01