कऱ्हाड : प्रत्येक घरात सध्या दुचाकी आहेच; पण गत काही वर्षांत कऱ्हाडसह पाटण तालुक्यामध्ये चारचाकींची संख्याही झपाट्याने वाढली आहे. कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यापासून रस्त्यावर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या वाढत असून, गत पाच वर्षांत वाहने दुपटीने वाढल्याचे दिसून येते. वर्षाला सरासरी २१ हजार नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत.
कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यानंतर गत काही वर्षांत येथे हजारो वाहनांची नोंदणी झाली आहे. पूर्वी दारात दुचाकी असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. त्यावेळी प्रत्येक गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच दुचाकींची संख्या असायची. मात्र, कालांतराने हे चित्र बदलले. दुचाकी सर्वसाधारण झाली. चारचाकीला महत्त्व आले. सध्या प्रत्येक दोन घरांपाठीमागे एका घरात चारचाकी वाहन उपलब्ध झाले आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत काही वर्षांपूर्वी वाहनांची संख्या मर्यादित होती. इतर वाहनांपेक्षा वाहन खरेदी करताना बहुतांश जण ट्रॅक्टरला पसंती द्यायचे. क्वचित एखाद्याच मोठ्या बागायतदाराकडे चारचाकी असायची; पण सध्या परिस्थिती एवढी बदलली आहे की, दारात कार असणेही आता सामान्य झाले आहे.
कऱ्हाडला २०१३ साली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले. पहिल्याच वर्षी येथे २६ हजार ७९२ एवढ्या नव्या वाहनांची नोंदणी झाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढतच गेली असून, सध्या वाहनांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे.
- चौकट
चौदा प्रकारात होते नोंदणी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी चौदा प्रकारांमध्ये करण्यात येते. दुचाकी, कार, प्रवासी वाहने, रिक्षा, ट्रॅव्हल्स, ट्रक, मालट्रक, टेम्पो, मालरिक्षा, रुग्णवाहिका, स्कूल बस, खासगी सेवा, ट्रॅक्टर, ट्रेलर, इतर वाहने या वर्गवारीत ही नोंदणी होते.
- चौकट
दुचाकीपाठोपाठ कारचीही चलती
कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ प्रवासी वाहतूक वाहनांची नोंदणी होते. लाखो रुपये किमतीच्या ब्रॅण्डेड कार कऱ्हाडात आहेत. त्याबरोबरच कित्येक लाख रुपये खर्चून अनेकांनी महागड्या दुचाकीही खरेदी केल्या आहेत.
- चौकट (फोटो : २०केआरडी०२)
वाहनांच्या नोंदणीची सरासरी
३९ टक्के : दुचाकी
२८ टक्के : कार, जीप
१५ टक्के : प्रवासी वाहने
११ टक्के : इतर वाहने
७ टक्के : मालवाहतूक
- चौकट
‘शोरूम’ची संख्याही वाढली
कऱ्हाडला २०१४ पर्यंत ठराविक वाहनांची हातावर बोटावर मोजण्याइतपत शोरूम होती. मात्र, परिवहन कार्यालय झाल्यानंतर येथे शोरूमची संख्याही झपाट्याने वाढल्याचे दिसते.
- चौकट
२०१४ साली फक्त ९९ हजार वाहने
कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यापूर्वी कऱ्हाडसह पाटण तालुक्यात एकूण वाहनांची संख्या ६७ हजार ४११ एवढी होती. त्यानंतर त्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, सध्या सुमारे अडीच लाख वाहने या दोन तालुक्यांत आहेत.
- चौकट
...अशी वाढली वाहनसंख्या
मार्च २०१४ : ९९ हजार ५०१
मार्च २०१५ : १ लाख २२ हजार १७२
मार्च २०१६ : १ लाख ४३ हजार ४७४
मार्च २०१७ : १ लाख ६२ हजार ७८०
मार्च २०१८ : १ लाख ८४ हजार ८८६
मार्च २०१९ : २ लाख ०४ हजार ३९२
मार्च २०२० : २ लाख १९ हजार ७५२
मार्च २०२१ : २ लाख ३५ हजार १५४
फोटो : २०केआरडी०३
कॅप्शन : प्रतीकात्मक