सातारा : गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या गणेश मंडळाच्या सात कार्यकर्त्यांना न्यायालयाने तब्बल २० हजारांचा दंड ठोठावला. हा दंड न दिल्यास १ महिना साधी कैद, अशी शिक्षाही न्यायालयाने सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्केटयार्डचा राजा भाजीमंडई या मंडळाने डॉल्बी लावली होती. त्यावेळी ध्वनी तीव्रता मर्यादेपेक्षा ३१.६ डेसिबल इतकी जास्त ठेवून पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संदीप पखाले यांनी या मंडळाच्या एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने प्रवीण कांबळे (रा. रविवार पेठ), सुयोग सकुंडे (बाबर कॉलनी, करंजे), नंदकुमार बोराटे (करंजे), विजय केंडे, राजेंद्र गोरे(रा. जंगीवाडा), संतोष धनवडे (बसाप्पा पेठ, सातारा) यांना २० हजारांचा दंड ठोठावला. तर डॉल्बी मालकाने गुन्हा नाकारल्याने त्याच्याविरोधातला खटला सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता कुंदाराणी तपासे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अश्विनी सूर्यवंशी, हवालदार सनस यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
साताऱ्यातील सात कार्यकर्त्यांना डॉल्बीमुळे वीस हजारांचा दंड
By admin | Published: September 11, 2015 9:25 PM