सातारा : अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका, असे पोलिसांकडून अनेकदा आवाहन करूनही पालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहतूक शाखेने बुधवारी अचानक शहरात मोहीम राबवून राबविली. ज्या मुलांच्या हातात पालकांनी गाडी दिली. त्या वीस पालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून पालकांना समज दिली. तसेच त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.वास्तविक अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणे हा खरं तर गुन्हा आहे. मात्र, विनाकारण पालकांना त्रास होऊ नये, म्हणून पोलीस सहानुभूतीची भूमिका घेत आहेत. याचाच अनेकजण गैरफायदा घेत असल्याचे पोलिसांना पाहायला मिळत आहे.
थर्टीफस्ट जवळ येत असल्याने मुलांच्या हातात इन्जॉयच्या नावाखाली पालकांकडून गाडी दिली जाते. त्यामुळे दर वर्षी थर्टी फस्टच्या कालावधीतच अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे यंदा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक शाखेने कंबर कसली आहे.सातारा शहरात बुधवारी सकाळपासून वाहन तपासणी सुरू होती. अल्पवयीन मुलांकडे गाडी दिसल्यास त्याला थांबविण्यात येत होते. वडिलांना बोलावून किंवा फोनवर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना माहिती दिली जात होती. आत्ता आम्ही तुम्हाला समज देतोय, या पुढे मुलाच्या हातात गाडी देऊ नका, असे सांगून पोलीस पालकांवर दंडात्मक कारवाई करत होते.
वाहतूक शाखेने राबविलेल्या या मोहिमेमुळे थर्टीफस्टच्या कालावधीत तरी होणारे अपघात नक्कीच रोखले जातील, असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.