शिरवळ : शिरवळ येथील मांड ओढ्यावरील पुलाच्या कामावरुन राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाअगोदरच शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन करुन भूमिपूजनाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे सोशल मीडियावर संबंधितांचा कलगीतुरा पाहण्यास मिळाला. एकाच दिवशी या ठिकाणी दोन नारळ फुटल्याने कार्यकर्तेही अवाक झाले.शिरवळ, ता. खंडाळा येथील जुन्या महाड-पंढरपूर रस्त्यावरील मांड ओढ्यावरील नवीन पुलाच्या उभारणीसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून ‘पूरहानी निधी अंतर्गत’ ९५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या पुलाचे भूमीपूजन रविवारी, आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, खंडाळा पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे, शिरवळ सरपंच छाया जाधव, उपसरपंच उदय कबुले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश परखंदे, विजय पवार, दिलीप गुंजवटे, रंजना बरदाडे, डॉ. शिल्पा राठी, बेबी फडके सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्तानाना ढमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर, शिरवळ शहराध्यक्ष चंद्रकांत मगर, अप्पासाहेब देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई, ठेकेदार निंबाळकर, राष्ट्रवादी औद्योगिक सेल तालुका उपाध्यक्ष अमीर काझी, मतीन शेख, अय्याज पठाण, रविराज दुधगावकर, महेश तोडकरी, ज्ञानेश्वर भोडे, संतोष वीर, सचिन पिसाळ, शिवाजी बधे, महादेव बधे, बाळासाहेब जाधव, सुनील बधे, पिसाळवाडीचे उपसरपंच बाळासाहेब पानसरे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी जुन्या पुलाची पाहणी करीत बांधकाम विभागाला नवीन पुलाच्या कामकाजाबाबत आवश्यक सूचना केल्या. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या या कार्यक्रमाच्या एक तास अगोदर शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील पुल युती शासनामुळे होत असल्याचे सांगून गिनिमी काव्याने पुलाचे भूमीपूजन केले. तसेच या कार्यक्रमाची छायाचित्रे सोशलमीडियावरही प्रसारित करून टाकली. त्यामुळे पुलाच्या श्रेयवादाचा गलगीतुरा सोशलमीडियावर जोरदार रंगला.राष्ट्रवादीनेही पुलाच्या कामाची मान्यता कधी आहे, याबाबातचे पत्र प्रसारीत करून प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपच्या या कार्यक्रमासाठी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, उपसभापती सारिका माने, उपतालुकाप्रमुख रमेश सोनावणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, भाजपचे माजी तालुकाप्रमुख राहूल हाडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा करत मांड ओढ्याच्या पुलासाठी निधी आणण्यात यश मिळविले आहे. पालकमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन कार्यक्रम घेणार होतो. याची कुणकुण संबंधितांना लागल्याने त्यांनी एक दिवसात फ्लेक्सबाजी करत भूमिपूजन घेतले आहे. याचे श्रेय फक्त युती शासनाचे आहे.-प्रदीप माने, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुखया पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी जानेवारी २०१४ मध्ये मिळाली आहे. त्यावेळी कोणाचे सरकार होते, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील कामांचे श्रेय घेण्यासाठी कुणी पोरकटपणा करीत असेल तर देव त्यांचे भले करो.-मकरंद पाटील, आमदारशिरवळच्या विकासात शुन्य योगदान असणाऱ्यांनी सर्वात आधी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. पुलाचे कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी आधी शिरवळसाठी शासनाकडून निधी आणावा. फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.- उदय कबुले, उपसरपंच शिरवळ
एकाच पुलासाठी फुटला दोनदा नारळ
By admin | Published: January 17, 2016 11:14 PM