सातारा/पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी बोपेगाव, ता. वाई येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात व्हॅनचालक लक्ष्मण सूर्यकांत सरगर (वय ५०, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेंद्रे, ता. सातारा हद्दीत दुचाकीवरील ताबा सुटल्याने चारीत पडून सचिन रघुनाथ पाटील (२७, रा. शिरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, आशियाई महामार्गावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोशी विहीरनजीक साताºयाहून पुण्याच्या दिशेने जाणाºया टेम्पोला (एमएच १४ जीयू ४५२) पाठीमागून आलेल्या व्हॅनने (एमएच १३ एन ६७८२) जोरदार धडक दिली. या अपघातात व्हॅनमधील लक्ष्मण सरगर व रुपाली लक्ष्मण सरगर (४९, दोघे रा. साखरवाडी, ता. फलटण) गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान लक्ष्मण सरगर यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
महामार्गावर दुसरा अपघात शेंद्रेनजीक घडला. सचिन पाटील हे साताºयाहून कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १० सीवाय ५६०८) जात होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेंद्रे येथील पिराचा दर्गा परिसरात आल्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला, यानंतर त्यांची दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या चारीत गेली. या अपघातात सचिन पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलिसांत नोंद झाली आहे.