सातारा : खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडून नवीन कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कायद्यातील तरतुदीविरोधात तसेच फेरविचार करण्यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील अडीच हजार दुकाने बंद असल्याने पेरणीतच शेतकऱ्यांना त्रास झाला. तर ७० ते ८० कोटींची खरेदी-विक्रीही थांबली.जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर क्षेत्र असून शेतकरी खते आणि बियाणे खरेदी करु लागले आहेत. यामध्येच कृषी निविष्ठा दुकानदारांनी तीन दिवसांचा बंद केला. शनिवारी याला तीन दिवस झाले. तर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी राज्य शासनाने नवीन काही कायदे प्रस्तावित केले आहेत. हे कायदे जाचक असल्याचे सांगून त्याला विरोध केलेला आहे. यामध्ये कृषी दुकानदार हे निविष्ठांचे उत्पादन करत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यतेनेच सीलबंद निविष्ठा खरेदी करुन ती शेतकऱ्यांनी विकली जाते.त्यामुळे पॅकिंगमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर नवीन जाचक कायदे हे विक्रेत्यांवर लादू नयेत, प्रस्तावित कायद्याचा फेरविचारही करावा, अशी मागणीही या विक्रेत्यांची आहे. यासाठी राज्य संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे कायदे रद्द करण्याची मागणीही केली आहे. यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विक्रेते सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात आज सुमारे अडीच हजार कृषी निविष्ठा विक्रीधारक आहेत. गुरुवारपासून त्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. कारण, सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे लागत आहेत. एेन पेरणी हंगामाच्या सुरुवातीलच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने शेतकऱ्यांना खरेदीच करता येत नाही. यामुळे पेरणीवर परिणाम झालेला आहे. तसेच फळबागांवर फवारणीसाठीही रासायनिक आैषधे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची तडफड वाढली आहे. त्यातच तीन दिवसांच्या बंदनंतर रविवारपासून दुकाने सुरू होण्याचे संकेत आहे. याबाबत शनिवारी रात्री उशिरा राज्य संघटनेची बैठक होणार आहे. त्यामध्ये दुकाने उघडायची की नाही हे ठरणार आहे.जिल्ह्यातील कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद असल्याने जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांची खते, आैषधे आणि बियाणे खरेदी-विक्री थांबल्याचे सांगण्यात येत आहे. यातून शासनाला जाणारा जीएसटीही थांबला आहे. तर हा बंद वाढला तर शेतकऱ्यांना फटका अधिक बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.