सातारा : दिव्यांग सर्व्हेचा मोबदला मिळावा, गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करुन घेणे, दिवाळी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी साताऱ्यात जेलभरो आंदोलन केले. तसेच गुरुवारपासूनच जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आशा सेविकांनी संप सुरू करुन काम बंद केले आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच जेलभरो आंदोलनही करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. आशा व गटप्रवर्तकांना मागील वर्षातील युनिफाॅर्म दोन साड्या मिळाव्यात, सातारा तालुक्यांतील आशांना आभा कार्डचा मोबदला देण्यात यावा.आशा सेविकांनी किती तास काम करावे आणि राहिलेल्या वेळेत कोणते काम करु नये याचे स्पष्टीकरण मिळावे, आरोग्य सुविधा मोफत देण्यात यावी, विना मोबदला कोणतेही काम सांगू नये, आॅनलाइन कामाची सक्ती करु नये तसेच केंद्र शासनाने महागाई निर्देशांकाप्रमाणे मानधनात भरीव वाढ करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णयही आशा सेविकांनी घेतला आहे.या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे, रेखा क्षीरसागर, चित्रा झिरपे, कल्याणी मराठे, सुवर्णा पाटील, रंजना फुके, वैशाली गुरव, राणी कुंभार, रुपाली पवार आदींसह आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.
सातारा जिल्ह्यातील अडीच हजार आशा सेविका संपावर, कामावर परिणाम
By नितीन काळेल | Published: October 19, 2023 6:39 PM