मायणी : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्याचा १५ डिसेंबर पूर्वीचे पहिले बिल रुपये अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली. बिल जमा झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घार्गे म्हणाले, ‘आजपर्यंत दोन लाख एकसष्ठ हजार मेट्रिक टनांचे उसाचे विक्रमी गाळप खटाव-माण अॅग्रोने केले आहे. या गळीत हंगामातील १६ नोव्हेंबरपूर्वीचे बिल शेतकऱ्यांचा खात्याांमध्ये दीपावलीत जमा करण्यात आले होते. त्यानंतर म्हणजे दि. १५ डिसेंबर २०२० पर्यंतचा पहिला बिल २५०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहेत.
को-चेअरमन मनोज घोरपडे म्हणाले, ‘साखरेच्या गुणवत्तेत खटाव-माण अॅग्रोने महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळवला असून, कारखान्यातील अन्य उत्पादने ही कारखान्यातून विक्री होत आहेत. खटाव-माण तालुक्याबरोबरच कऱ्हाड उत्तरमधील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे, विक्रम घोरपडे, महेश घार्गे, जनरल मॅनेजर अशोक नलवडे, व्यवस्थापक अमोल पाटील, काकासाहेब महाडिक, बालाजी जाधव, जयदीप थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. (वा. प्र.)