सातारा: सात-बारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना मसूर सजाचा तलाठी व अन्य एकास लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
तलाठी नीलेश सुरेश प्रभुणे (वय ४५, रा. मलकापूर, संगमनगर, ता. कऱ्हाड) रविकिरण अशोक वाघमारे (२७ रा. मसूर, ता. कऱ्हाड) अशी लाच घेताना सापडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, मसूर, ता. कऱ्हाड येथील जमिनीचा सात-बारा उतारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदार हे मसूर येथील तलाठी कार्यालयात गेले होते. या कामासाठी संबंधित तलाठी प्रभुणे याने दोन हजारांची लाच मागितली. त्याच्याविरोधात तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. २७ रोजी पडताळणी करून दि. २८ रोजी सापळा लावला. यावेळी रविकिरण वाघमारेने ही रक्कम स्वीकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक राजे, कॉन्स्टेबल काटकर, येवले, भोसले, पोलीस अडागळे, आदींनी केली.