सातारा : गणेशोत्सवापाठोपाठ दुर्गादेवी उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सातारा पालिकेची तयारी सुरू झाली आहे. बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्यात दुर्गामूर्तींचे विसर्जन केले जाणार असून, या तळ्यात पाणी भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कल्याणी शाळेजवळील कृत्रिम तळ्यातही विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे.
बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेकडून ५० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी आणि १२ मीटर खोलीच्या महाकाय तळ्याचे खोदकाम गेल्यावर्षी करण्यात आले. हे तळे बंदिस्त न केल्याने याच तळ्यात यंदा प्लास्टिक कागद (लायनर) टाकून व पाणीसाठा करून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
याच तळ्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गामूर्तींचे विसर्जनही केले जाणार आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या तळ्याची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच शेजारी असलेल्या चार विहिरींवर मोटारी लावून तळ्यात पाणी भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तळ्यात ७५ ते ८० लाख लिटर पाणीसाठा केला जाणार आहे. तसेच कल्याणी शाळेजवळ तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यातही मूर्ती विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. पाणीसाठा झाल्यानंतर तळ्याभोवती बॅरिकेट्स, स्टेजची उभारणी केली जाणार आहे. मिरवणूक सोहळा रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने दोन्ही तळ्यांच्या परिसरात प्रखर उजेड राहावा, यासाठी विजेचे मनोरे उभारले जाणार आहेत. मूर्ती विसर्जन करताना क्रेनला कसलाही अडथळा होऊ नये, याची खबरदारी पालिका प्रशासनाने घेतली आहे.