सातारा : राज्य तसेच देशपातळीवरील विविध पुरस्कार पटकावणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीचा बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आणखी दोन पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्रामउर्जा स्वराज विशेष पुरस्कार प्रदान झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि सरपंच रवींद्र माने यांनी हे पुरस्कार स्वीकारले.मान्याचीवाडी गावाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळवले आहेत. तसेच शासन योजना आणि उपक्रमांतही मोठे योगदान दिलेले आहे. आताही गावाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामविकासात प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार देण्यात येतात. यातील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामउर्जा विशेष पुरस्कार मान्याचीवाडीला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झाले.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, ‘यशदा’चे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी सरिता पवार, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद यादव, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, वंदना पाचुपते आदी उपस्थित हाेते.
Satara: मान्याचीवाडीचा दिल्लीत गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुरस्कार
By नितीन काळेल | Published: December 11, 2024 7:13 PM