कऱ्हाड/ तांबवे : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाताना दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये एकजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. कऱ्हाड-पाटण मार्गावर तांबवे फाटा, ता. कऱ्हाड येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय ६०, रा. साजूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर गंभीर जखमी असलेल्या ओंकार अकुंश पाटील, रणजित जगन्नाथ पाटील (रा. साजूर) व अजित जगदीश साळुंखे (रा. काले, ता. कऱ्हाड) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.साजूर गावातील एकाचा वाढदिवसाचा कार्यक्रम बुधवारी रात्री कऱ्हाडमध्ये होता. त्यासाठी साजूर गावातून राजेंद्र चव्हाण, ओंकार पाटील व रणजित पाटील हे तिघेजण दुचाकीवरून (एमएच ५० जे ७०८०) कऱ्हाडकडे येत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते तांबवे फाट्यापासून थोड्या अंतरावर आले असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीची (एमएच ११ एए ७३१३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात राजेंद्र चव्हाण हे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
एकाच दिवसात दोन अपघाततांबवे फाटा आणि साकुर्डी गावच्या हद्दीत पाचशे मीटर अंतरात बुधवारी दोन अपघात झाले. यामध्ये साकुर्डी येथे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीची रस्त्याकडेला थांबलेल्या रिक्षाला धडक बसली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुचाकीस्वार बचावला. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले. तसेच रात्री दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा जीव गेला. तर तिघे जखमी झाले.
साकुर्डीकर धावले मदतीलादुचाकींचा अपघात झाल्यानंतर साकुर्डीतील ग्रामस्थांनी जखमींना तातडीने मदत केली. उपसरपंच विश्वासराव कणसे, पोलिस पाटील जयदीप देवकर, सुनील पाटील, संदीप साळुंखे, किसन थोरात, सुरेश शिंदे, अतिश कणसे यांच्यासह व्यापारी आणि तरुणांनी अपघातस्थळी धाव घेत वाहनांना वाट करून दिली तसेच जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात पाठवून देत माणुसकी जपली.