सातारा : औंध पोलीस ठाण्यातील लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला फौजदाराच्या पतीसह एका पोलीस कर्मचाऱ्याची गुरुवारी कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, महिला फाैजदाराची लाचलुचपत विभागाकडे चाैकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रकांत दादासाे शिंदे (वय ३४, रा. गुरसाळे, ता. खटाव) असे पोलीस हवालदाराचे, तर सुशांत सुरेश वरुडे (३५, मूळ रा. विटा, जि. सांगली, सध्या रा. औंध) असे महिला फाैजदाराच्या पतीचे नाव आहे. औंध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सोसारख्या संवेदनशील गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख ५० हजारांची लाच मागून त्यातील ५० हजारांची लाच घेताना या दोघांना लाचलुचपतच्या विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले होते. गुरुवारी या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी एसीबीने त्यांना अद्याप जाबजबाब नोंदवायचे असून, त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
या प्रकरणात महिला फाैजदाराच्या पतीचा समावेश असल्यामुळे संबंधित महिला फाैजदाराचीही बुधवारी चाैकशी करण्यात आली. मात्र, आणखी चाैकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.