ऑनलाइन लोकमत
क-हाड (सातारा), दि.04 - करमाळा येथील रावसाहेब जाधवच्या खून प्रकरणात मंगळवारी दोन पोलिसांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणात अटकेत असणारे सहाजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत.
सुमित विजय मोहिते व नितीन चंद्रकांत कदम अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. क-हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल असणा-या चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी जून २०१६ मध्ये करमाळा येथील रावसाहेब जाधवला ताब्यात घेतले होते. रावसाहेबसह त्याचा मेहुणा अनिल डिकोळे हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात होता. पोलीस त्या दोघांकडे तपास करीत असताना कार्वेनाका पोलीस चौकीत रावसाहेबची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अनिल डिकोळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी, हवालदार दिलीप क्षीरसागर, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, अतुल देशमुख, नितीन कदम, सुमित मोहिते, शरद माने, संजय काटे, अमोल पवार व कृष्णा खाडे यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले. सुरूवातीला या प्रकरणात कृष्णा खाडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह कर्मचारी न्यायालयात हजर झाले. या सर्वांकडे तपास झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायायलयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी संशयितांविरोधात पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही सादर केले आहे. यापूर्वी चारजणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मंगळवारी आणखी दोघांना जामीन मंजूर करण्यात आला.