राज्यभरात कोरोना पुन्हा सक्रिय झाला असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यातही कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असून, रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. बनवडी येथेही पुण्याहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहे. संबंधित दोन्ही बाधित रुग्णांना शनिवारपासून त्यांच्याच घरी आयसोलेट करण्यात आले आहे. बनवडीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचा फैलाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी सक्रिय झाले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वजण स्वत: रस्त्यावर उतरले असून, सर्वांना मास्क वापरण्यासाठी विनंती करीत आहेत, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी त्याला रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे बनवडी ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे.
- कोट
कोरोनाचे महाभयंकर संकट पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. त्याला वेळीच रोखने गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी शासनाने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे, नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे करता येईल ते प्रयत्न करीत आहोत.
- विकास करांडे
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य
फोटो : २१केआरडी०२
कॅप्शन : बनवडी, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून ग्रामस्थांना मास्क वापरण्याबाबत सूचना केल्या जात आहेत, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. (छाया : शंकर पोळ)