मलकापूर : ‘पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. इमारतीचा परिसर सुशोभीकरण करणे, इंटरनेट नेटवर्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व लिफ्ट बसविणे या उर्वरित कामांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने दोन कोटींचा निधी पालिकेस मंजूर झाला आहे,’ अशी माहिती मनोहर शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, ‘पालिकेने हाती घेतलेली नवीन प्रशासकीय इमारत ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची प्रतिकृती असल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही इमारत उल्लेखनीय आहे. शहरातील नागरिकांना नागरी सुविधांबरोबरच प्रशासकीय कामकाज एकाच इमारतीमध्ये होऊन नागरिकांना उत्तम सेवा मिळावी, याकरिता नवीन प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. येथील पालिकेस स्वत:ची एकत्रित कार्यालये नसल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करून या इमारतीमध्ये पालिका विभागांचे एकत्रित कामकाज सुरू करायचे आहे. या इमारतीच्या उर्वरित कामासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून उर्वरित कामासाठी दोन कोटी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. हा निधी उपलब्ध होण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व पालिकेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या उर्वरित कामासाठी निधी मंजूर झाला. त्याचे पत्र मुंबई मंत्रालय येथे सतेज पाटील यांच्या हस्ते मनोहर शिंदे यांना सुपूर्द केले.
०२मलकापूर
मलकापूर पालिकेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या उर्वरित कामासाठी निधी मंजूर झाला. त्याचे पत्र मुंबई मंत्रालय येथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मनोहर शिंदे यांना सुपूर्द केले.