चाफळ : जाळगेवाडी ता. पाटण ग्रामपंचायतीच्या दोन विद्यमान सदस्यांची निवड अपात्र ठरविण्यात आली आहे. वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याची तक्रार रविंद्र दामोदर गुरव यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही कारवाई केली. या अपात्रतेच्या कारवाईमुळे जाळगेवाडीसह संपूर्ण चाफळ विभागातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जाळगेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकी दरम्यान थेट सरपंचपदी शिवाजी काटे व सात सदस्य निवडून आले होते. यात, मागास प्रवर्गातुन प्रभाग तीन मधून बाळाराम तात्याबा सुतार व महिलांच्या मागास प्रवर्गातून प्रभाग दोन मधून उषाताई तानाजी सुतार या निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर या दोन सदस्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायतीत सरपंच काटे यांच्यासह सर्व सदस्य हे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे आहेत. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पाटणकर गटाला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. त्यामुळे दोन सदस्य अपात्र ठरले तरी या ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचीच सत्ता राहणार आहे. असे असले तरी दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार पडल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.या अपात्रतेच्या कारवाईवर संजय गांधी निराधार योजनेचे पाटण तालुका अध्यक्ष भरत साळुंखे यांनी हरकत घेत ग्रामविकास राज्य मंत्री यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र सदर करत या कारवाई वरती स्थगिती आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही अपात्रतेची निवड रद्द होईल असे अध्यक्ष भरत साळुंखे यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.