सातारा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पुणे, बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
पंकज मधुकर थोरात (वय २३) व शुभम एकनाथ लोंढे (२४, दोघेही रा. हिंगनोळे, पो. कोरिवळे, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम लोंढे याचा मावसभाऊ सचिन चंद्रकांत जाधव हा कोडोली (सातारा) येथे राहावयास आहे. शुभम लोंढे हा वरचेवर कोडोली येथे येत असे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शुभम लोंढे व त्याचा मित्र पंकज थोरात हे साताऱ्यातून दुचाकीवरून हिंगनोळेकडे निघाले. यावेळी दुचाकी पंकज चालवत होता. रात्री अकराच्या सुमारास महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीतील श्रीराम मंगल कार्यालयासमोर त्यांची दुचाकी आली असता त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची बाेरगाव पोलीस ठाण्यात नाेंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर या अधिक तपास करत आहेत.