कऱ्हाड : युवक व हॉटेलमधील वेटर यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यावेळी युवकांनी एकमेकांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. तसेच काचेच्या बाटल्याही भिरकावल्या. त्यामध्ये पाचजण जखमी झाले असून, काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारुंजीफाटा-कऱ्हाड येथील हॉटेल शिवराज ढाब्यासमोर रविवारी दुपारी ही घटना घडली.दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दगडफेकीत नुकसान झालेली वाहनेही पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने पोलिस ठाण्यात आणली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडनजीक वारुंजी फाटा येथे पाटण रस्त्यालगत हॉटेल शिवराज ढाबा आहे. या हॉटेलमधील काही वेटर शनिवारी सायंकाळी फाट्यावर आले होते. त्यावेळी वारुंजीतील काही युवकांशी त्यांचा वाद झाला. बाचाबाची सुरू असतानाच परिसरातील ग्रामस्थांनी त्या युवकांना हटकले. तसेच वादावर तात्पुरता पडदा टाकला. त्यानंतर संबंधित युवक व वेटर तेथून निघून गेले. दरम्यान, रविवारी दुपारी या वादाचादीचे पर्यवसान तुंबळ मारामारीत झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तीस ते चाळीस युवकांचा जमाव हॉटेल परिसरात जमला. या युवकांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्याच्या पलीकडील बाजूस असलेल्या युवकांनी हॉटेलच्या दिशेने दगड भिरकावले. तर हॉटेलच्या बाजूस असलेल्या युवकांनी काचेच्या बाटल्या भिरकावल्या. तसेच कऱ्हाड-पाटण मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. दगड व बाटल्या फेकाफेकीनंतर युवकांचे दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी लाकडी दांडक्याने मारामारी सुरू केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच मारामारी करणाऱ्या युवकांनी तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. काही युवकांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. तर काहीजणांनी तेथून पोबारा केला. मारामारीत जखमी झालेल्या युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (प्रतिनिधी)
कऱ्हाडात दोन गटांत हाणामारी; ५ जखमी
By admin | Published: February 12, 2017 10:39 PM