सातारा : साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी रिपाइच्या दोन गटात जोरदार हमरी तूमरी झाली. अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला. मात्र, वेळीच यामध्ये मध्यस्थी झाल्याने हा वाद मिटला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावणीचा कार्यक्रम झाल्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे रिपाइच्या दोन गटांमध्ये वाद झाला. गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार प्रसारमाध्यमांच्या समोर घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भीम फेस्टिवलमध्ये लावणीचा कार्यक्रम झाल्याने हा वाद वाढला होता. त्यातूनच संजय गाडे आणि संदीप शिंदे यांच्यात जोरदार वाद झाला.यावेळी तेथे रिपाइ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे हे ही होते. या वादावेळी एकमेकावर अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तसेच जोरदार बाचाबाची झाली. या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बराचवेळ हा प्रकार सुरू होता. मात्र, या दरम्यान रिपाईतील काहीजणांनी वादावर पडदा टाकला. रिपाइं (ए) गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तसेच अण्णा वायदंडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच दरवर्षी भीम फेस्टिवल हा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी संजय गाडे आणि संदीप शिंदे हेही तेथे उपस्थित होते.
साताऱ्यात आरपीआयच्या दोन गटात राडा, आंबेडकर जयंती निमित्त लावणी कार्यक्रम घेतल्याचा निषेध
By दीपक शिंदे | Published: April 25, 2023 3:55 PM