पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, अनावळे, पेट्री तसेच कास पठार परिसरात गुरुवारी सायंकाळी दीड ते दोन तास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपात पाऊस पडला. दरम्यान, बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस देखील पडला. सलग तीन दिवस काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. गुरुवारी या परिसरात सायंकाळी चार वाजल्यापासून उन्हाळी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊन दीड ते दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच चाललेला असताना, गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने तसेच गुरुवारच्या मुसळधार पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण होण्यास मदत झाली आहे. बहुतांशी ठिकाणी रस्त्यावर तसेच शेतात पाणी साचल्याचे दिसून येत होते. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा तसेच गारा वेचण्याचा आनंद घेतला.