सातारा : शहरालगत अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील हॉटेल फर्नसमोर एका चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. सचिन हणमंत गायकवाड आणि नितीन हणमंत बल्लाळ (रा. देगाव, ता. वाई, जि. सातारा) अशी जखमींची, तर अभिजित गणपत निकम (वय ३२, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नितीन बल्लाळ आणि त्यांचा मावसभाऊ सचिन हणमंत गायकवाड हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच ११ - झेड ४४३४ ) अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याने हॉटेल फर्नसमोर आले होते. समोरून चारचाकी (एमएच ११ - सीक्यू ४६३६) घेऊन आलेल्या अभिजित निकम यांनी जोराची धडक दिली. यात नितीन आणि सचिन दोघे जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अभिजितवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करीत आहेत.