पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील उड्डाण पुलावर कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून चारजण जखमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. ९ रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास झाला. सुभाष बाबूराव पाटील व प्रवीण नामदेव टेगिमाळी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १० सीएक्स ९८०७) च्या चालकाने जोशी विहीर उड्डाण पुलावर समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील दहाजणांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मदतकार्य करून उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सुभाष बाबूराव पाटील (वय ७१, रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) व प्रवीण नामदेव टेगिमाळी (१८, रा. दत्त कॉलनी, जत, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला, तर महेश महादेव नवाळे (४२), शुभांगी महेश नवाळे (३२), शबाना मोहम्मद पठाण (३८, तिघे रा. विटा, जि. सांगली), प्रणव दीपक लोंढे (२१, रा. वाळुंज, ता. खानापूर, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्वजण व्यापारी असून ते कावीळ रोगावरील औषधोपचारासाठी नाशिक येथे निघाले होते.
अपघाताची माहिती मिळताच वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे-खराडे, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस हवालदार शिवाजी तोडरमल, राजकुमार खताल यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो
०९पाचवड -ॲक्सिडेंट
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे मंगळवारी पहाटे ट्रकला कारची धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. (छाया : महेंद्र गायकवाड)