साताराः वर्ये-सातारा रस्त्यावर रविवारी रात्री आठच्या सुमारास दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
रुपेश रामचंद्र राठोड (वय ३५, रा. चिंचणी, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर), गिरीश प्रकाश सोनवणे (वय ३९, रा. तामजाई नगर, करंजे तर्फ सातारा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रुपेश राठोड हे दुचाकीवरून साताऱ्याहून लिंबकडे निघाले होते तर गिरीश सोनवणे हे लिंबहून साताऱ्याकडे येत होते. यावेळी वर्येजवळ राठोड मोटरसमोर या दोघांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर दोघांना रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली तर त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
रुपेश राठोड हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे मजुरीचे काम करत होते तर गिरीश सोनवणे हे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत होते. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.