अमित जगताप
नागठाणे (सातारा) : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला कारची जोराची धडक झाली. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे (ता.सातारा) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर चौघे जखमी झाले आहेत. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.नाना साळुंखे (वय- ६९), लक्ष्मी साळुंखे (६२, मूळ रा. ढेबेवाडी, ता. कराड, सध्या रा.ठाणे) अशी मृत दोघांती नावे आहेत. तर, माधुरी साळुंखे (२५) मच्छिन्द्र जाधव (४०), तनुजा जाधव (३५) कनुष्क जाधव (४, सर्व मूळ. रा.ढेबेवाडी ता. कऱ्हाड सध्या रा.ठाणे) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गांवर नागठाणे गावचे हद्दीतील चौकात सातारा ते कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचे बाजूला ट्रक थांबला होता. या ट्रकला पाठिमागून येणाऱ्या कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पेट्रोलिंग प्रमुख दस्तागीर आगा यांनी तसेच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. तसेच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. बोरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.