सातारा : तारळे खोऱ्यातील मालोशी,ता. पाटण येथे भरदिवसा तीन चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि. २ रोजी घडली.याबाबत अधिक माहिती अशी, मुरूड परिसरातील मालोशी आळीतील शालन रामचंद्र पवार (वय ६५) या दि. २ रोजी त्यांच्या घरापासून जवळच अन्य महिलांसमवेत गोधडी शिवत होत्या. त्यावेळी साडेबाराच्या सुमारास तीन युवक दुचाकीवरून आले. या युवकांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
कपाटातील तीन तोळ्याचे दागिने अर्धा किलो चांदी आणि पाच हजारांची रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. शालन पवार यांच्या दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. काही महिलांनी त्यांच्या घरातून तीन मुले बाहेर जाताना पाहिले असल्याचे समोर आले आहे.
ही मुले मोरेवाडी मार्गे घाटातून साताऱ्याकडे निघून गेली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या मालोशी गावातील बहुतांश पुरुष मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. गावी केवळ वयोवृद्ध लोक राहतात. शालन पवार यांचाही मुलगा मुंबई येथे नोकरीनिमित्त राहात आहे. चोरी झाल्याचे समजल्यानंतर ते गावी आले आहेत. तारळे दूरक्षेत्रामध्ये अद्याप या घटनेची नोंद झाली नाही.