सातारा : मित्रांसमवेत थायलंड येथे फिरायला गेलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघांनी थायलंडमध्ये बीचवर एका परदेशी तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विजय दादासाहेब घोरपडे (वय ४७, रा. चिलेवाडी, ता. कोरेगाव), राहुल बाळासाहेब भोईटे (४०, रा. तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघेही व्यावसायिक असून, थायलंड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.विजय आणि राहूल हे दोघे मित्रांसमवेत थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. थायलंडमध्ये १४ मार्च रोजी लारिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी परदेशी तरुणी तिच्या मित्रासोबत आली होती. ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित दोघांनी तिला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे दोघेही कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक १ मधील बंगल्यावर निघून गेले.
अत्याचार झाल्यानंतर परदेशी तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा तपास सुरू केला. कोह फांगन पोलिस स्टेशनच्या अधीक्षकांनी सुरुवातीला रीन बीचवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्ह्याच्या ठिकाणावरून पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची पोलिसांनी ओळख पटवली. १६ मार्चला पीडित तरुणी शुद्धीवर आली.
त्यावेळी पोलिसांनी दोघा संशयितांना परत चौकशीसाठी बोलावून घेतले. पीडित तरुणीने त्या दोघांची ओळख पटवली. हिंसेचा वापर करून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी या दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे बँकॉक पोस्टने आल्या वृत्तात म्हटले आहे.
कोरेगाव तालुक्यातील संबंधित दोघांची नावे थायलंड येथील अत्याचार प्रकरणात समोर आली आहेत. याची माहिती सातारा जिल्हा पोलिस दलाला देण्यात आली आहे. - समीर शेख, पोलिस अधीक्षक, सातारा