ढेबेवाडी विभाग गत काही वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने हैराण झाला आहे. शेतकऱ्यांना शेती करणेही अवघड होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर बनपुरी-भालेकरवाडी येथील अकरा शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. प्रल्हाद भिलारे यांनी शासनासह स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांना पाठविलेल्या नोटीस पाठविली आहे. भालेकरवाडीसह अन्य गावांमध्ये निर्माण झालेल्या बिकट स्थितीकडे या नोटीसद्वारे संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले असून, कार्यवाहीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. संबंधित शेतकरी कसत असलेल्या शेतातील विविध पिके व फळझाडांचे वानर, मोर, रानडुक्कर, मोकाट श्वान आदींकडून नासाडी सुरू आहे. वानरे ग्रामस्थांच्या अंगावर धावून येत आहेत. पेरणी केली असून, त्यांचा शिवारात उपद्रव सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी घातलेला खर्च वाया जात आहे. अवेळी पाऊस, रोगराई, लॉकडाऊन, वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झालेले आहे.
दोन महिन्यांच्या मुदतीमध्ये नोटीसनुसार कारवाई न झाल्यास या शेतकऱ्यांना कायदेशीर व सामाजिक लढा उभारावा लागेल. त्यापासून होणाऱ्या खर्चाला तसेच नुकसानीला राज्य शासन जबाबदार राहील, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
- चौकट
शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या
१) घरोघरी किंवा शेतावर जाऊन जबाब नोंदविण्यात यावेत.
२) कुंपण किंवा अन्य उपायांतून वन्यप्राण्यांचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा.
३) शेतकऱ्यांना शासनामार्फत एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
४) मालमत्ता कर, विजेसह पाणी बिल कायमस्वरूपी माफ करावे.