गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन घरवापसी केली आहे.
शहरी वातावरणाचे आकर्षण, टीव्ही, चित्रपट, मालिकांचा प्रभाव याचा सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलांमुलींवर परिणाम होत आहे. प्रेमप्रकरण, घरचा वाद, पालकांची अवास्तव भीती यामुळे आणि इतरही क्षुल्लक कारणांमुळं मुलं घर सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात विशेषत: अल्पवयीन मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. गत तीन महिन्यांत सातारा बसस्थानक पोलिसांनी आढळून आलेल्या पाच मुलांना तर तीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही सर्व मुले सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे.
क्षुल्लक कारणापोटी ही मुले घर सोडतात, शहरात येतात आणि पैसे संपले की वणवण भटकतात, त्यांच्या या असा' अवस्थेचा मग काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. बसस्थानक परिसरात फिरणारे असामाजिक घटक खेडोपाड्यातून आलेल्या गरीब मुलांना हेरून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे बालपण हिरावून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सातारा बसस्थानक पोलिस चौकीतील हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
दोन महिन्यांत तब्बल आठ मुलं बसस्थानकात सापडली. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून आलेली मुलगी तर काही मुलं घरातील भांडणामुळे घराबाहेर पडली होती. साधारणत: घरातून पळून आलेली मुलं गणवेशातील पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात. तर काही मुले रडायला लागतात. त्यांच्याकडील पैसे संपलेले असतात, त्यांना चूक कळलेली असते. घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत हवी असते. भरकटलेल्या अशा मुलांना सातारा बसस्थानक पोलिसांनी वेळीच पालकांच्या स्वाधीन केल्याने खºया अर्थाने त्यांची घरवापसी झाली आहे.