सातारा - जिल्ह्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण समोर आले असून, आता एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ५ वर पोहोचली आहे. हे सर्व रुग्ण फलटण तालुक्यातील आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराबाबत जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५८५ जण परदेशातून आले आहेत. यांपैकी ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात फलटण तालुक्यातील चौघांना तसेच खंडाळा तालुक्यातील एकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर संबंधितांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील फलटणमधील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे आरोग्य विभागाने या ओमायक्रॉन बाधितांच्या निकट असणाऱ्या दोघांचे नमुने घेऊन चाचणी केल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
यानंतर, आरोग्य विभागाने या दोघांचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठविले. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला असून, या दोघांनाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आता ओमायक्रॉनचे एकूण ५ रुग्ण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील कोरोना बाधितांचा ओमायक्रॉन अहवाल येणे बाकी आहे.