सातारा: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सोमवारी आणखी दोन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ जणांना हा आजार झाला असून त्यातील ७ जणांचा बळी गेला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ रुग्णांवर, कराड ३ तर खासगी रुग्णालयात २९ जणांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढू लागली आहे.
जिल्ह्यात कोविडपश्चात उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस या आजारामध्ये ज्या अवयवास बाधा होते. त्याप्रमाणे लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये डोळ्याला बाधा झाली तर डोळा लाल होणे. त्यातून सातत्याने पाणी येणे, दृष्टी कमी होणे, डोळे सुजणे, चेहरा सुजणे तसेच नाकाला किंवा घशाला त्रास झाला असेल तर सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मेंदूपर्यंत हा आजार गेला तर रुग्ण बेशुद्ध होते अन यामध्ये त्या रुग्णांस आकडी येण्याचे प्रमाण वाढले जाते. कोरोनामधून बरे झाले रुग्णांमध्ये तसेच मधुमेही रुग्णांमध्ये हा म्युकरमायकोसिस आजार तत्काळ होत आहे. या म्युकरमायकोसिस आजारांबाबत काही रुग्णांवर पुणे येथेही उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ रुग्ण आढळले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून त्यात १७ बेडची क्षमता आहे.