परळी : सातारा तालुक्यातील जुंगटी येथील संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८) व शंकर दादू जानकर (वय ५२) यांच्यावर शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कात्रेवाडी हद्दीत जंगलातून जात असताना दोन अस्वलांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संतोष कोकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या चवताळलेल्या अस्वलाने कोकरे यांच्या शरीराचे मोठे मोठे लचके तोडले आहेत तर शंकर जानकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अस्वलानी हल्ला केल्याने कास परिसरात खळबळ निर्माण झाली आहेयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील जुंगटी येथील शंकर दादू जानकर व संतोष लक्ष्मण कोकरे हे सकाळी साडे अकराच्या सुमारास जुंगटीवरून कारगाव येथे आपल्या आत्याकडे पाहुणे निघाले होते. जंगलातून चालत असताना कात्रेवाडीच्या हद्दीत आल्यानंतर दोन अस्वलांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. जानकर यांनी हल्ल्याचा प्रतिकार करायला सुरुवात केल्यानंतर एक अस्वल जंगलात पळून गेले. मात्र, दुसऱ्या अस्वलाने संतोष कोकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला व त्यांना खाली पाडून त्यांच्या डोक्याला मांडीला हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले.
जखमींनी अस्वलाचा प्रतिकार करीत आपल्या जवळची काठी आपटत आरडाओरडा केला. ही घटना ग्रामस्थांना समजतात त्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची गाडी आली व त्यांनी अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैया भोसले यांनी जखमींची विचारपूस करीत त्यांना तात्काळ उपचार करण्याच्या सूचनाही केल्या.