सातारा : फलटण ते बारामती रस्त्यावर दोन देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह जालन्यातील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.
गणेश बारकू वाळके (वय २८, रा. बोरगाव, तारू, ता. भोकरदन जि. जालना) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाला फलटण येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या.
फलटण ते बारामती रस्त्यावर पोलिसांचे पथक कोंबिंग ऑपरेशन करत असताना एक जण दुचाकीवरून (एमएच ११ सीएल २९९७) जात असताना पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे २ लाख ४ हजार रुपये किमतीची २ देशी पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी असा मुद्देमाल सापडला. गणेश वाळके असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. फलटण शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलिस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित झेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धीरज महाडिक, मोहसिन मोमीन आदींनी ही कारवाई केली.