सातारा : जावखेड, ता. पाथर्डी येथील दलितांच्या तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वतंत्रपणे मोर्चा काढण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला. त्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील जावखेड येथील तीन दलितांवर अमानुष अत्याचार केले आहेत. खुनानंतरही मृतदेहांची विटंबना केली आहे. अद्यापही या घटनेचा तपास लावता आलेला नाही. याच जिल्ह्यातील सोनई येथील नितीन आगे हत्याकांड प्रकरणही घडले आहे. निवेदनावर दादासाहेब ओव्हळ, मदन खंकाळ, गणेश भोसले, विशाल बोकेफोडे यांच्या सह्या आहेत. भारिप बहुजन महासंघातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील जावखेड येथील दलितांवरील अत्याचाराच्या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराला काळीमा फासली गेली आहे. यामुळे राज्यातील दलितांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचा भारिप बहुजन महासंघ निषेध करत आहे. सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. यासाठी शासनाने योग्य ते पावले उचलावीत. अहमदनगर जिल्ह्यात वर्षभरात वारंवार दलित समाजाला लक्ष्य करून त्यांच्यावर अमानुष हल्ला, तसेच हत्या केली जात आहे. मात्र, त्यांमधील दोषींना अटक करण्यात व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन, पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे तेथील गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. सर्वसामान्यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मागासवर्गीयांसाठी संवेदनशील म्हणून घोषित करावे, या प्रकरणातील दोषींवर वेळीच कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.निवेदनावर चंद्रकांत खंडाईत, मु. का. खराटे, सुभाष गायकवाड, चित्रा गायकवाड, अविनाश गायकवाड यांच्या सह्या आहेत. यावेळी शामराव काकडे, अक्षय भोसले, दादासाहेब कांबळे, बाळासाहेब सावंत, विजय मोरे, ज्योती जगताप, कल्पना कांबळे उपस्थित होते. दोन्ही मोर्चे एकाचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले, त्यावेळी भारिप बहुजन महासंघाला प्रतीक्षा करावी लागली. (प्रतिनिधी)
पाथर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ दोन मोर्चे
By admin | Published: October 27, 2014 9:10 PM