याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा-सांगली एस. टी. गुरुवारी दुपारी तीन वाजता सुमारास महामार्गावर गांधीनगर काशीळ येथे बंद पडली होती. त्यामुळे चालकाने बस महामार्गालगत बाजूला उभी केली होती. या नादुरुस्त बसला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या एस.टी.ने धडक दिली.
या अपघातात स्वारगेट-कोल्हापूर बसचा वाहक दगडू वसंत मुदगल (वय ५२) यांच्यासह त्यातील प्रवासी शुभम दगडू मुदगल (२०), वैशाली दगडू मुदगल (४४, तिघे रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संदीप कागले (४८), तुषार संतोष कागले (२१), कोमल संतोष कागले (२३), शारदा संतोष कागले (४७), आदित्य संतोष कागले (१७, सर्व रा. सेवाधाननगर चिथोड, जि. धुळे), संगीता संतोष पोतदार (३८, रा. मलकापूर, कऱ्हाड) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार सुनील जाधव, मनोहर सुर्वे, किरण निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी कऱ्हाड येथे पाठविले. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून स्वारगेट-कोल्हापूर बसचालक अजित मारुती पाटील (रा. तिटवे, राधानगरी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम तपास करत आहेत.
फोटो ०८सातारा-अॅक्सीडेंट
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात एस.टी.चे मोठे नुकसान झाले. त्यात नऊजण जखमी झाले. (छाया : अमित जगताप)