शिरवळ : शिरवळ परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयातील शिक्षक दाम्पत्य व अन्य एका विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच शिक्षक व विद्यार्थी बाधित झाल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
कोरोनाबाधितांचा आलेख मंदावल्यानंतर शासनाकडून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुरक्षिततेची काळजी घेत सुरू करण्यात आले. दरम्यान, शिरवळ परिसरातील एका महाविद्यालयातील शिक्षक दाम्पत्य व अन्य एका विद्यालयातील दोन विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या दहा विद्यार्थ्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असून शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शिक्षकांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दिवसभरात शिरवळमध्ये पाच, तर देवघर पुनर्वसन याठिकाणी दोन असे सात रुग्ण आढळून आले आहेत.
(चौकट)
उपाययोजनेची गरज
लॉकडाऊनपूर्वी खंडाळा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ही संख्या पूर्णत: नियंत्रणात आली आहे. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी, मास्कविना निर्धास्त वावरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सचा फज्जा अन् नागरिकांचा निष्काळजीपणा संक्रमण वाढीसाठी कारणीभूत ठरू लागला आहे. तालुका आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.
लोगो : कोरोनाचा फोटो