सातारा : मुंबई येथे इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी येणार असल्याने स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन हजार कार्यकर्ते जाणार आहेत. यावेळी त्यांना प्रतापगड भेटीचे निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली. देसाई म्हणाले, केंद्रातील जुलमी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी येणार असून त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र काँग्रेस सज्ज झाली आहे. स्वागतासाठी राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार असून यामध्ये सातारा जिल्ह्यातून दोन हजाराहून जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्ते राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, सदस्य रणजितसिंह देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधीच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातून दोन हजार काँग्रेस कार्यकर्ते मुंबईला जाणार
By नितीन काळेल | Published: August 29, 2023 6:52 PM