विठ्ठल नलवडे -- कातरखटाव तालुक्यातील कातरखटाव येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. लोकसहभागातून व सावली फाउंडेशनच्या पुढाकारातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, ओढ्यातील गाळ काढण्याबरोबर विहीर पुनर्भरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, येथील तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉली गाळ निघणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढीस मोठी मदत होणार आहे. सध्या कातरखटाव गावाजवळ असणाऱ्या एका बंधाऱ्यातून गाळ काढण्यात येत आहे. तसेच बंधाऱ्याची गळती काढून उंची दोन फू ट वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा तसेच येत्या पावसाळ्यात पाणी मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे. तसेच इतर दोन बंधाऱ्यातीलही लवकरच गाळ काढण्यात येणार आहे या ‘जलयुक्त शिवार’अभियान कार्यक्रमाच्या वेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, खटावचे तहसीलदार विवेक सांळुखे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी बी. एच. दाभाडे, कृषी सहायक यू. एन. चिकुटे, सरपंच तानाजीशेठ बागल, उपसरपंच संतोष बागल, ग्रामसेवक आर. व्ही. अहिरेकर, डॉ. आकाराम बोडके, प्रशांत पाटील, अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अजित सिहांसने, पोपट बागल, जयकुमार बागल व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व जलयुक्त शिवार कामामध्ये गावातील सर्व लोकांचा सहभाग दिसून आला पाहिजे, असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.शेतकऱ्यांकडून गाळाची वाहतूक...कातरखटावची ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत निवड करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील एका बंधाऱ्याचे आठ दिवस काम चालणार आहे. सध्या दिवसाला शंभर ट्रॉली गाळ उचलला जात असून, आठ दिवसांत हजार ते बाराशे ट्रॉली गाळ निघणार आहे. येथील सर्व तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉलींच्यावर गाळ निघणार आहे. सध्या येथील गाळ शेतकरी घेऊन जात आहेत. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढणार आहे.
बंधाऱ्यांतून निघणार दोन हजार ट्रॉली गाळ...
By admin | Published: January 01, 2016 10:22 PM