कऱ्हाड : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. पाटण तालुक्यातील नवारस्ता ते मरळी जाणाऱ्या रस्त्यावर काल, रविवारी हा भीषण अपघात झाला. जखमींवर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नितीन बबन तिकुडवे (वय ३६, रा. शिंदेवाडी, ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (४३) व बबन धोंडिराम पडवळ (७०, दोघेही रा. येरफळे, ता. पाटण), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी, ता. पाटण), संकेत सीताराम शिंदे (रा. तामकणे, ता. पाटण) या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात मृत नितीन तिकुडवे याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील नितीन तिकुडवे व अनिकेत पाटील हे दोघेजण रविवारी रात्री दुचाकीवरून नवारस्ताहून मरळीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी भरत पाटील, बबन पडवळ व संकेत शिंदे हे तिघेजण मरळीहून नवारस्त्याच्या दिशेने येत होते. नाडे-नवारस्ता गावच्या हद्दीत सांगवड पुलाजवळ दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्या. त्यावेळी नितीन तिकुडवे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसली.ही धडक एवढी भीषण होती की दोन दुचाकीवरील पाच जण रस्त्यावर फेकले गेले. अपघातात सर्वांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना कऱ्हाडला रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. हवालदार कांबळे यांनी याबाबतची फिर्याद पाटण पोलीस ठाण्यात दिली असून, अपघातप्रकरणी मृत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Accident: दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघे ठार, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 6:21 PM